top of page
Search

तारुण्य पिटीका / Acne व प्रभावी आयुर्वेदिक चिकित्सा


तारुण्य पिटीका / Acne व प्रभावी आयुर्वेदिक चिकित्सा

तारुण्य पिटीका (पिंपल्स) या त्वचा विकाराला तारुण्याला मिळालेला शाप म्हटले जाते कारण १३ ते २६ वयोगटातील ५० ते ६० % तरुण/ तरुणी या त्वचा विकाराने त्रस्त आहेत. या मुळे पर्सनॅलीटी मधे कमतरता वाटतेच सोबत कॉन्फीडंस सुद्धा कमी होतो म्हणुनच हा विकार तरुणांना शारीरीक व मानसीक कष्ट देतो. टीव्ही शो, चित्रपट, सौंदर्य स्पर्धा यामुळे सतेज व नितळ त्वचा व सुंदर दिसण्याच गोड स्वप्न सर्व तरुणाईच्या विशेषकरुन तरुणींच्या मनात असते,  पण बर्‍याच जणांसाठी हे दुरचे व पुर्ण न होणारे स्वप्न ठरते. या त्वचा विकारास प्रमुख कारण असते या वयातील उधानलेली हार्मोन्स, उत्कट झालेले कफ-वात-रक्त दोष व चुकीचा आहार- विहार.

या त्वचा विकारात चेह‍र्‍यावर वेदनायुक्त कींवा वेदनारहीत मुरुम व पुटकुळ्या उत्पन्न होतात, या काही व्यक्तींमध्ये सौम्य तर काहींमध्ये तीव्र स्वरुपाच्या असतात. साधारणत: १३ ते २६ या वयोगटातील तरुणाई या विकाराने जास्त प्रभावीत असल्याने यास तारुण्यपिटीका किंवा मुखदुषिका असे म्हटले जाते.

तारुण्यात उत्कट असलेल्या हार्मोन्स व कफ इ.दोषांमुळे चेहर्‍यावरील त्वचेतील तैलग्रंथी(Sebaceous glands) व स्वेदग्रंथींमध्ये जास्त प्रमाणात तैलयुक्त स्त्राव तयार होतो व त्वचा तेलकट पडते हा स्त्राव दिवसेंदिवस वाढतच राहतो व या कालावधीत केलेल्या चुकीच्या आहार विहारामुळे अधिकच घट्ट होत जातो व तेथे(Sebaceous glands) जीवाणुंच्या वाढीसाठी अनुकुल वातावरण तयार होते. वाढलेले जीवाणु हे त्या ग्रंथीचा आकार वाढवुन त्याचे मुख(Pilosebaceous duct) बंद करतात व परिणामी चेहर्‍यावर मुरुम पुटकुळ्या उत्पन्न होतात. तारुण्यपिटीका वाढवण्यात आहारासोबतच कॉस्मेटीक्स,वातावरण, मानसिक तणाव, मलावष्टंभ व ऋतुमान देखिल कारणीभुत असतात. तसेच पित्तप्रकृतीच्या व्यक्तींना तारुण्यपिटीका जास्त भेडसावतात.

"शाल्मलीकण्टकप्रख्या: कफमारुतशोणितै:।

जायन्ते पिडका युनां वक्त्रे या मुखदुषिका:॥" सुश्रुत संहीता(नि.१३/३९)

आचार्य सुश्रुतांनुसार मुखदुषिका या शाल्मली (काटेसाबर) वनस्पतीला येणार्‍या काटयांच्या आकाराच्या असतात व कफ- वात- रक्त या दोषांमुळे तरुण व्यक्तींच्या चेहर्‍यावर यांचा प्रादुर्भाव अधिक असतो.


तारुण्य पिटीका / Acne लक्षणे-

-चेहर्‍यावर शाल्मलीच्या काट्यांप्रमाणे पुटकुळ्या उत्पन्न होणे.

-पुट्कुळ्यांच्या ठीकाणी वेदणा, सुज व दाह असणे तसेच चेहरा निस्तेज व काळा पडणे.

-पुट्कुळ्यांच्या मध्यभागी ब्लॅकहेड किंवा व्हाइटहेड तयार होणे.

-पुटकुळ्यांमधुन पु युक्त स्त्राव बाहेर पडणे व चेहरा विद्रुप होणे.

-चेहर्‍याव्यतिरीक्त मान, पाठ यांवर देखिल पुटकुळ्या येतात तसेच डोक्यात कोंडा व खाज येते.

 

पिटीकांच्या कमी जास्त प्रमाणावरुन त्यांच्या ४ ग्रेड केल्या जातात, पुढच्या ग्रेडच्या पिटीका उपचारास कठीण होत जातात.

*ग्रेड १- चेहर्‍यावर ३० किंवा त्यापेक्षा कमी मुरुम/ पुटकुळ्या उत्पन्न होणे.

*ग्रेड २- मुरुम व पु सदृश्य स्त्रावयुक्त पुटकुळ्या उत्पन्न होणे.

*ग्रेड ३- मुरुम, पु व वेदनायुक्त पुटकुळ्या तसेच जुन्या पुटकुळ्यांच्या ठीकाणी छोट्या गाठी तयार होणे.

*ग्रेड ४- पु युक्त स्त्रावी व वेदनायुक्त पुटकुळ्या, सुज व वेदनायुक्त गाठी, चेहरा निस्तेज होणे व कायमस्वरुपीचे काळसर पिटीकायुक्त व्रण चेहर्‍यावर तयार होणे.

 

तारुण्य पिटीका / Acne कारणे-

आयुर्वेदानुसार तारुण्याच्या काळात होणार्‍या या त्वचाविकारास कफ, वात व रक्तदुष्टी करणारा आहार-विहार कारणीभुत असतो.

- लवण, अम्ल व क्षारयुक्त पदार्थांचे अतिसेवन. कुळीद, उडीद, तीळ, मुळा यांसारख्या अभिष्यंदी पदार्थांचे अतिसेवन

- मासे, चहा-कॉफी, धुम्रपान,रात्री दही खाणे, उष्ण पदार्थ, अंबवुन बनवलेले खाद्य पदार्थ, दिवसाझोप, रात्री जागरण

- शिळे पदार्थ, फास्ट फुड/ जंक फुड, तळलेले समोसा, वडापाव यांसारखे पदार्थ यांचे अतिसेवन

- विरुद्ध आहार सेवन ( जसे- दुध व फळे एकत्र खाणे)

- केमिकल युक्त कॉस्मेटीक्सचा अतिवापर

- तसेच मलावष्टंभ, मानसिक तणाव, उष्ण- आर्द्रतायुक्त वातावरण व पित्तप्रकृती ही देखिल पिटीका वाढण्यास पोषक कारणे आहेत.

 


नाशिक मधील बेस्ट आयुर्वेदिक डॉक्टर

तारुण्य पिटीका / Acne उपचार-

आधुनिक चिकीत्सा पद्धतीनुसार यात अँन्टीबायोटीक्सचा प्रामुख्याने वापर केला जातो, सोबत Isotretinoin, Benzoyl peroxide, अ-जीवनसत्व व स्टेरॉइड औषधांचा वापर केला जातो.

आयुर्वेदानुसार चिकित्सा करतांना सर्वप्रथम निदान परीवर्जन करावे म्हणजेच वर कारणांमध्ये सांगीतलेला सर्व आहार-विहार टाळावा.

तसेच तारुण्यपिटीकांच्या मुख्य दोषांची म्हणजेच कफ-वात व रक्त यांची चिकित्सा होणे गरजेचे असते यासाठी वमन, सिरावेध, नस्य, जलौकेने रक्तमोक्षण तसेच विरेचन ही पंचकर्म केली जातात. सोबत कफ दोष व रक्तदुष्टी कमी करणारी निम्ब, गुळवेल, पटोल, सारीवा इ. वनस्पतींनी युक्त काढे, वटी, घृत या औषधी वापरल्या जातात, तसेच चेहर्‍यावर लेप करण्यासाठी लोध्र, वचा, धान्यक, कुष्ठ यांसारख्या वनस्पतींचा वापर केला जातो. यानंतर चेहर्‍यावरील डाग नाहीसे होण्यासाठी काही लेप व तैल वापरली जातात.

 

पथ्य- (तारुण्यपिटीका होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी)-

- तारुण्यपिटीकेच्या कारणांमधे सांगीतलेला सर्व आहार टाळावा.

- मलावष्टंभ होऊ नये यासाठी फायबर युक्त व हिरवा भाजीपाला आहारात जास्त घ्यावा.

- चेहरा दिवसातुन ३ ते ४ वेळा हर्बल साबन किंवा उटन्याने धुवावा.

- दररोज ३ ते ४ लीटर पर्यंत पाणी प्यावे.

- दिवसा झोप टाळावी तसेच रात्री पुरेशी (६ ते ८ तास) झोप घ्यावी)

- रोज सकाळी य़ोगा व व्यायाम करावा. मानसिक तणाव व चिंता टाळावी.

- उन्हात फीरताना छत्रीचा वापर करावा.

- तसेच पौष्टीक व योग्य आहार योग्य वेळेवर सेवन करावा.

 

 

-          -- डॉ.योगेश शिवाजी चव्हाण, एम.डी.(आयु.) केरळ

Comments


bottom of page