पी हळद (दूध) वाढव प्रतिकारशक्ती...
- वैद्या चित्रा बेडेकर – कुलकर्णी
आयुष्कामीय चिकित्सालय
‘पी हळद हो गोरी’ ही म्हण मागे पडून ‘पी हळद (दूध) वाढव प्रतिकारशक्ती’ अशी नवी म्हण कोरोनाच्या काळात व कोरोना-उत्तरकाळात रूढ करावी लागेल अशी लक्षणं आता दिसू लागली आहेत.
#प्रतिकारशक्ती वा #Immunity हा एक परवलीचा शब्द झालेला आहे सध्या. प्रतिकारशक्ती वाढवणारं असं जे काही कळेल ते सगळंच्या सगळं आपल्या पोटात गेलंच पाहिजे असं वाटू लागलं आहे, मग ते च्यवनप्राश असो, कोणता काढा असो, गुळवेल अश्वगंधा तुळस असो, लिंबू पाणी असो वा हळद दूध असो. आता तर कोरोनाकृपेने चहा, खाखरा, ब्रेड, चॉकलेट, आईसक्रीम ....इ. ही अश्वगंधा-तुळस-गुळवेल-च्यवनप्राशययुक्त Immunity Booster बनले आहेत.
हळदीनं रोगप्रतिकारशक्ती वाढते. हळद आयुर्वेदातलं औषध आहे. Anti-inflammatory आणि anti-oxidant आहे. तसंच हळद आपल्या मिसळणाच्या डब्यातली रोजच्या वापरातली तर आहे. हळद घातलेल्या दुधानं वाईट तर काही होणार नाही. झालं तर चांगलंच होईल, या विचारानं हळद घातलेल्या दुधाचा सध्या what’s app, Facebook व घराघरांत, रुग्णालायांमध्ये ‘पीत-महापूर’ आलेला दिसतो. त्याच्या परिणामी सध्या कोविड१९ ने बाधित न झालेले, कोविड१९ ला प्रतिबंध करू इच्छिणारे, कोरोना बाधित (लक्षणे असणारे व नसणारे) यातील बरेचसे लोक हळदीचं दूध घेत आहेत. काहीजणांना आपण ते घ्यावं का नाही,? त्यानं प्रतिकारशक्ती खरंच वाढते का? असे प्रश्न पडू लागले आहेत. पुष्कळशा रुग्णालयांत व कोविड१९ विलगीकरण कक्षांमध्ये (Quarantine centers) मध्ये प्रवेशित कोरोना बाधित रुग्णांनाही हळदीचं दूध नाश्त्यासह, रात्रीच्या जेवणानंतर दिलं जात आहे.
भारतीय चित्रपट सृष्टीही, जिचा जनमानसावर मोठा प्रभाव पडतो, ती हळद दूध हे खोकला, लागण्या-भागण्यावरचा घरगुती औषधोपचार असल्याचं शिक्कामोर्तब खूप वर्ष करत आलेली आहे.
परिणामी हळद दूध सध्या आपलं राष्ट्रीय पेय बनू लागलं आहे.
ज्या आयुर्वेदाचा हवाला देऊन या हळद दुधाचा मारा चालू आहे तो आयुर्वेद या विषयी खरोखर काय सांगतो हे समजून घ्यायलाच हवं ना !
यानिमित्तानं सर्वसामान्यांना दूध, हळद आणि हळद घातलेलं दूध यांविषयी पडणाय्रा काही प्रश्नांतून याची उत्तरं आयुर्वेदाच्या मदतीनं शोधूयात.
१) प्रत्येकानं दररोज दूध घेतलंच पाहिजे असं आहे का ?
दुधाला आयुर्वेदात रसायन म्हणजे जणू काही शरीराला नवसंजीवनी देणारे सांगितलेले आहे. परंतु प्रत्येकाला दररोज दूध पिणे योग्य ठरेलच असे नाही. ज्यांची पचनशक्ती मंद आहे, ज्यांना कफाचे आजार झालेले आहेत, मधुमेह, स्थौल्य, त्वचारोग, आमवात, सूज आहेत त्यांनी परिस्थिती सुधारेपर्यन्त किंवा नंतरही दूध न पिणंच चांगलं. किंवा वैद्यांच्या सल्ल्यानं काही औषधांबरोबर उकळून दूध घेता येऊ शकते.
2) दूध कधी प्यावं? नाश्त्यानंतर दूध घ्यावं का? रात्री झोपण्यापूर्वी दूध घ्यावं का ?
दूध रसायन काम करते. यासाठी स्वस्थ (Healthy) व्यक्तीनं सकाळी अनशापोटी दूध पिणं चांगलं. इतरही वेळी वैद्यांच्या सल्ल्यानुसार घेता येईल.
सध्या साधारणपणे नाश्त्यानंतर दूध घेतलं जातं. नश्त्यात मीठ, आंबट पदार्थ, फळे यांचा समावेश असल्यास व त्यावर दूध घेतल्यास ते अपथ्य आहे. दुधाबरोबर आंबट पदार्थ एकत्र घेऊ नयेत.. फळांबरोबर, मिठाबरोबर किंवा एकत्र करून (शिकरण, फ्रूटसलाड) दूध घेऊ नये. तसे केल्यास अनेक रोग उत्पन्न होऊ शकतात. सध्या रुग्णालयात प्रवेशित कोविड१९ रुग्णांना प्रतिकारशक्ती वाढवणारे सी-व्हिटामिन मिळावे म्हणून संत्रे इ. फळे व त्याबरोबर आयुर्वेदसम्मत म्हणून हळद घालून दूध असं एकत्र नाश्त्यात दिले जात आहे, असं समजतं. जे अत्यंत अपथ्य आहे. रोगावर उपाय होण्याऐवजी अपायच होण्याची शक्यता आहे.
रात्री दूध पिणं चांगलं असतं, दूध रात्री प्यायल्याने झोपही चांगली लागते, असे गैरसमज असतात. म्हणून वर्षानुवर्ष लोक रात्री झोपताना दूध पीत असतात. सध्या हळद दूध घेत आहेत. आयुर्वेदानुसार दूध व दुग्धजन्य पदार्थ (दही, ताक पनीर, खवा..इ) सूर्यास्तानंतर खाऊ वा पिऊ नयेत. त्याने सर्दी, खोकला आदि कफाचे रोग, अजीर्ण वा अन्य अनेक रोग होण्याची शक्यता निर्माण होते. ज्वर (ताप) वाढू शकतो. ताप असलेल्या कोविड१९ च्या रुग्णांना हळद दूध देणं आणि ते रात्री झोपताना देणं अतिशय अपथ्य आहे.
रात्री दूध, विशेषतः म्हशीचं दूध पिणे हे निद्रानाशावरील एक औषध आहे. परंतु सरसकट सर्वच लोकांनी व सर्वच निद्रानाशांत ते घ्यावं असं मात्र नक्कीच नाही.
3) दुधात काय मिसळून प्यावे?
दुधात तयार हेल्थ ड्रिंक्स मिसळू नयेतच. प्रोटीन पावडरही पचायला जड पडते, ती ही टाळावी. रोझ सिरप आदि सिरप्सही मिसळू नयेत. त्यात सायट्रिक अँसिड (अम्ल) असते. दुधात साखर, तूप, केशर, बदामपूड, सुंठ मिसळली जाते. वैद्यांच्या सल्ल्यानुसार आपल्या आरोग्यासठी योग्य काय हे जाणून ते मिसळावे. हळद रोज मिसळणे व कायम हळदीचे दूध पिणे योग्य नाही.
4) ताप असताना दूध प्यावं का? हळदीचं दूध चालतं का ?
ताप असताना दूध पचवण्याइतकी पचनशक्ती नसते. त्यामुळे दूध घेतल्यास ते न पचून ताप वाढणे, पोटात गुबारा धरणे असे त्रास होऊ शकतात. नवज्वरात (तापाच्या सुरुवातीच्या काळात) दूध पिणे हे विषाप्रमाणे आहे असं आयुर्वेद सांगतो. हळद घातलेल्या दुधानेही हेच होते. कोविड१९ च्या रुग्णांना ताप असताना हळद दूध देणे अयोग्य आहे.
5) खोकल्याच्या प्रतिबंधासाठी वा खोकला झाल्यास हळदीचं दूध पिणं योग्य आहे का ?
कफ वाढून खोकला होण्याची शक्यता असेल वा झाला असेल तर हळद हे त्यावरील औषध आहे. परंतु ते दुधा बरोबर न घेता मधाबरोबर किंवा गरम पाण्या बरोबर घेतल्यास अधिक योग्य आहे. कारण अशा अवस्थेत दूधामुळे कफ आणि पर्यायानं खोकला वाढू शकतो. हळद रूक्ष म्हणजे कोरडेपणा आणणारी आहे. कोरड्या खोकल्यात हळदीचा उपयोग होत नाही. खोकला वाढूही शकतो.
6) हळदीने रोगप्रतिकारशक्ती वाढते का ?
हळद मधुमेह, त्वचारोग, रक्ताच्या अशुद्धीमुळे होणारे रोग, सूज, डोळ्यांचे रोग, व्रण अशा अनेक रोगांवरील श्रेष्ठ गुणकारी औषध आहे. हळद रसायन कामही करते. रसायन म्हणजे थोडक्यात नवसंजीवनी देणारे औषध. असे औषध जे शरीरातील सर्व घटकांना नवचैतन्य देते, आयुष्य वाढवते, प्रतिकारशक्ती वाढवते. आयुर्वेदात अशी अनेक औषधे आहेत. प्रत्येक व्यक्तीसाठी, व्याधीसाठी एकच रसायन औषध उपयुक्त नसते. व्यक्तीनुसार, व्याधीनुसार वेगवेगळे वापरावे लागते. तसेच त्या रसायन औषधाचा विशिष्ट औषधांसह विशिष्ट पद्धतीनेच वापर केला तरच ते रसायन काम करते. तेव्हा हळद वा हळद दूध हे सर्वांसाठी रसायन काम करणारे म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवणारे औषध नाही.
हळदीतील Curcumin हा घटक जरी Anti-inflammatory आणि anti-oxidant काम करतो असं संशोधन असलं तरीही आयुर्वेदात जे गुणधर्म सांगितले आहेत ते हळदीचे आहेत, Curcumin चे नव्हेत. आयुर्वेदात हळद पोटात औषध म्हणून वापरण्या बरोबरच नस्य (नाकात औषध टाकणे), लेप , परिषेक (औषधाची धारा धरणे), आश्चोतन (डोळ्यांच टाकायचे थेंब), कर्णप्रक्षालन (कानात टाकायचे औषध) अशा अनेक प्रकारे वापरली जाते. ती कधी मधाबरोबर, दुधाबरोबर, ताकाबरबर, गोमूत्राबरोबर व अन्य अनेक औषधांबरोबर वापरता येते. तिचे कधी चूर्ण वापरतात तर कधी काढा, चाटण, औषधी दूध, औषधी तूप, औषधी तेल, औषधी पेज. औषधी कढण अशा अनेक प्रकारे वापरली जाते. अशा विविध प्रकारे विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी परिणामकारकपणे हळदच आयुर्वेदात वापरली जाते, Curcumin नाही.
Also Read : What is Panchakarma Treatment
7) हळदीचे वा हळद दुधाचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का ?
हळद रूक्ष म्हणजे शरीरास कोरडेपणा आणणारी असते. उष्ण आहे. त्यामुळे कोरड्या खोकल्यावर हळदीचा उपयोग होत नाही. उलट कोरडेपणा वाढून त्रास वाढू शकतो. नित्य उपयोगाने हळद शरीरात कोरडेपणा वाढवू शकते, वजन कमी करू शकते व इतरही त्रास होऊ शकतात. हळदीने मासिक रजःस्राव सुरु होणे किंवा तो वाढणे असे परिणाम होऊ शकतात. तेव्हा अति रजःस्रावाचा त्रास असणाय्रा स्त्रीयांनी व गर्भवती स्त्रीयांनी हळदीचे दूध वैद्यांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.
आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की ‘पी हळद हो गोरी’ या म्हणीचा गर्भित अर्थ हाच आहे की हळद पिऊन कोणीही लगेच गोरं होत नसतं. सर्वसाधारणपणे बहुतांश प्रश्नांना लगोलग फलदायी असे सोपे उपाय नसतात. एखादी गोष्ट साध्य करायला दीर्घकाळ कष्ट घ्यावे लागतात. प्रतिकारशक्ती वाढवायलाही असे साधे सोपे १५-२० दिवसांचे वा एक-दोन महिन्यांचे उपाय नसतात. हळद वर्ण्य आहे. म्हणजें वर्ण सुधारणारी आहे. तरीही हळद प्यायल्यावर लगेचच कोणी गोरं होत नसतं. तसंच हळद दूध पिऊन सगळ्यांची प्रतिकारशक्तीही वाढणार आहे आणि ती लगोलग वाढणार आहे, असं निश्चितच नाही.
बरे झालेल्या (म्हणजे test report negative आलेल्या ) कोविड१९ रुग्णांची आरोग्याची स्थिती यापुढच्या काळात कशी राहते हे अजून निश्तितपणे कळायचं आहे. काळ जाईल तसे ते परिणाम समोर येतील. काही शारिरिक व मानसिक परिणाम दिसू लागले आहेत. गंभीर रुग्ण, जे व्हेंटिलेटर व होते त्याच्यातील काहींना गंभीर स्वरूपाचे नंतर टिकणारे परिणाम दिसून येऊ लागले आहेत. तर अल्प वा मध्यम लक्षणे ज्यांना होती त्यांनाही दीर्घकाळ अंगात तापाची कसर राहणे, पचनाचे त्रास, पोट जड व गुबारलेले राहणे, अतिसार, उलट्या असे त्रास होत आहेत. कदाचित हे त्रास अंगात ताप असताना व पचन मंदावलेले असताना प्रतिकारशक्तीसाठी भरपूर प्रमाणात व अंडी इत्यादी पचायला जड असा तथाकथित पोषक आहार, हळदीचं दूध अशा गोष्टीही कारणीभूत ठरत असतील.
आयुर्वेदात सर्व रोगांसाठी सर्वांना खात्रीशीर लागू पडणारा व प्रतिकारशक्ती वाढवणारा एकच रामबाण उपाय नसतो. रुग्णाचे वय, प्रकृति, पचनशक्ती, त्याला झालेला रोग, रोगाची अवस्था, ऋतु असे अनेक घटक लक्षात घेऊन औषधयोजना केली जाते.
त्यामुळेच lock down काळातील आहार व जीवनशैली विषयी पूर्वी लिहिलेल्या लेखात (शीर्षक - कोरोनासाठी ....कोरोनाच्या निमित्ताने) ‘प्रतिकारशक्तीसाठी वा कोरोनासाठी कोणतेही औषध मी सुचवणार नाही’ असं म्हटलेलं होतं.
हळद हे जरी अत्यंत गुणकारी श्रेष्ठ औषध असलं आणि हळद दूध हे अनेक रोगांवरचं पारंपरिक भारतीय घरगुती औषध आहे असा (गैर)समज असला तरी ते अयोग्य प्रकारे घेत राहिलं तर अपाय करणारच नाही असं नक्कीच नाही.
हीच बाब च्यवनप्राश, काढे, गुळवेल, शतावरी, पिंपळी, अश्वगंधा, तुळस इत्यादी ज्यांचा सध्या अनावश्यक व अयोग्य वपर वाढला आहे त्याही बाबतीत लक्षात घ्यायला हवी. नाहीतर कोरोना राहिला बाजूला, अयोग्य व अनावश्यक औषधांमुळेच आरोग्य बिघडलेल्या रुग्णांना औषध द्यायची वेळ न येवो, ही धन्वन्तरी चरणी प्रार्थना !
खरं तर तशी वेळ येऊनही ठेपली आहे. तेव्हा तज्ञ्ज वैद्यांच्या सल्ल्याशिवाय या सर्व औषधांचा वापर करू नये.
शेवटी एक तितकंच महत्तवाचं – या औषधांच्या अनावश्यक वापरानं वाढलेल्या मागणीस पुरे पडण्साठी या औषधांची निसर्गात वारेमाप तोड सुरु होऊन औषधी वनसंपदेचा नाश मात्र ओढवेल. आणि जेव्हा व ज्यांना या औषधांची खरंच गरज असेल त्यांना ती मिळू शकतील का? याचाही विचार व्हयला हवा.
Author-
वैद्या चित्रा बेडेकर – कुलकर्णी
आयुष्कामीय चिकित्सालय
Comments